-
•
आज साने गुरुजींची १२५ वी जयंती.
लहानपणी एका वाढदिवसाला पप्पांनी **‘‘श्यामची आई‘‘** हे पुस्तक भेट म्हणून दिलं आणि तेव्हापासून माझी आणि साने गुरुजींची ओळख झाली. प्रत्येक दिवशी गृहपाठानंतर एक तरी गोष्ट वाचायची असं ठरलेलं असायचं. **मोरी गाय, भूतदया, श्यामचे पोहणे, अळणी भाजी, श्रीखंडाच्या वड्या, अर्धनारी नटेश्वर**, **तू वयाने मोठा नाहीस ... मनाने...**, **देवाला सारी प्रिय** - या आणि इतर अनेक गोष्टी आजही माझ्या डोळ्यांसमोर जिवंत उभ्या राहतात. पुढे कालांतराने त्यांची इतर अनेक पुस्तके, गोष्टी, कविता वाचण्याचा योग आला आणि साने गुरुजीं बाबत माझा आदर वाढत गेला. **धडपडणारा श्याम, शबरी, तीन मुले, फुलाचा प्रयोग, बेबी सरोजा, सुंदर पत्रे, सारोब आणि रुस्तुम** - प्रत्येक पुस्तकातून मी काही तरी नवीन शिकत गेलो, नवीन जीवनमूल्ये आत्मसात करीत गेलो. साने गुरुजी एक थोर साहित्यकार तर होतेच, पण त्याहीपेक्षा ते एक आदर्श शिक्षक, तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या लेखणीत माणुसकीचं मर्म होतं, धर्म, जात, पंथ यापलीकडचं व्यापक मानवी दर्शन होतं. आजच्या काळात, साने गुरुजींच्या विचारांची जास्त गरज आहे. त्यांच्या विचारांतून त्यांनी माणुसकीची, सहिष्णुतेची आणि देशसेवेची शिकवण दिली. ‘‘माणूस म्हणून कसं असावं,’’ याचा सार त्यांच्या प्रत्येक शब्दांत आहे. आज त्यांची जयंती साजरी करताना आपण सर्वांनी हेच लक्षात ठेवायला हवं, की धर्म, जात, पंथ यांच्यापलीकडे जाऊन माणुसकी जपणं आणि देशाच्या उत्थानासाठी काम करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. साने गुरुजी नसले तरी त्यांच्या विचारांच्या, शब्दांच्या माध्यमातून ते आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. त्यांचं साहित्य आणि विचार टिकवून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांचं जीवन म्हणजे एक प्रेरणा आहे—सतत काहीतरी चांगलं करण्याची, चांगलं होण्याची.10
© 2025 Indiareply.com. All rights reserved.