Community Information
-
•
Pune Vs PCMC
कामानिमित्त पिंपरी-चिंचवडला (ज्याला मराठीत PCMC म्हणतात) बरेचदा जाणं होतं. काही निरीक्षणे सांगतो. १. PCMC हा पुण्याला लागून असलेला अतिशय मागास भाग आहे. इथे रस्ते, उद्याने, मैदाने वगैरेंसाठी उगाचच भरपूर जागा सोडलीय. काही ठिकाणी सर्व्हिस रोड्सही केलेयेत. मुळातच ते शहर प्लॅन केलेलं वाटतं. डेव्हलप्ड शहरे प्लॅन करावी लागत नाहीत. ती बिल्डर्सला वाहून द्यायची असतात. २. PCMC मध्ये आधी रस्ते बनतात आणि त्यानंतर आजूबाजूला बिल्डींगा उभ्या राहतात. हा अगदी मागास प्रकार आहे. आधी इमारती उभ्या करायच्या आणि मग तिथे राहणाऱ्या लोकांनी मागणी/आंदोलने वगैरे केल्यानंतरच तिथे रस्ता बांधण्याचा खर्च करायचा, हा पुण्यातला शहाणपणा त्यांना अजूनही कळलेला नाही. ३. PCMC मध्ये अनेक ठिकाणी पाइपलाइनने पाणी येतं, असं म्हणतात. हा अगदीच सामान्य प्रकार आहे. इथे आम्ही आंघोळ करावी म्हणून आमच्यासाठी खास टॅंकरने पाणी येतं, तेही भरपूर ट्रॅफिकमधून वाट काढून! ४. PCMC मध्ये बहुतांश लोक हे ऑटोमोबाईल, मॅनिफॅक्चरिंग सारख्या सोप्या क्षेत्रांत काम करतात. तिथे कविता, लेखन, संगीत, क्रिएटिव्ह थिंकिंग वगैरे कठीण आणि समाजास अत्यंत उपयुक्त अशा विषयांत काम करणारे तज्ज्ञ फारसे मिळत नाहीत. पुण्यात एखाद्या कवीने त्याच्या काव्यात ‘ अलवार ‘ हा शब्द वापरला नाही, तर त्याला तडीपार करून PCMC त पाठवतात, असं म्हणतात. पुढे त्याला चाकणमध्ये नोकरी मिळते. त्यामुळे तो तडीपार होऊनही खुश राहतो. तसंही तडीपार झालेल्या लोकांचं नशीब म्हणजे…. असो! ५. PCMC मधून पुण्यात कॅबने परत येतानाचा प्रवास खूपच मस्त असतो. पुण्यातले खड्डे/गर्दी/जाम सुरू झाल्यानंतर कॅब ड्रायव्हर चिडतो. मागे बसलेल्या ग्राहकाशी बोलायला लागतो. वीस वर्षांपूर्वीचं सुंदर पुणं, त्याला खराब करायला आलेली बाहेरची गर्दी, यावर भरभरून बोलतो. स्वतः मात्र मूळचा सोलापूरचा आहे, हे भावनेच्या भरात विसरून जातो. ह्या सगळ्याला हे भोसरीचे राजकारणी जबाबदार आहेत, हे त्याचं ठाम मत असतं. भोसरी हा PCMC मधलाच एक भाग आहे. -Unknown Author1
© 2025 Indiareply.com. All rights reserved.